शनिवार, फेब्रुवारी २८, २००९

माझ्या प्रकाशीत कविता





१. बॉम्बस्फोट

मुंबईमध्ये धुमाकूळ घालतोय, दहशतवादाचा भस्मासुर
शहराचा चेहरा दिसतोय, पहा किती भेसूर

बॉम्बस्फोटांच्या मालिकेत, मुंबईकर जातोय सुळी
राज्यकर्त्यांनो सांगा, 'अजुन किती जायला हवेत बळी?'

सुरक्षेची येथे, नाही कसली तटबंदी
मुंबईमध्ये येण्यास, नाही कोणाला बंदी

झोपड्यांच्या खाली हरवला आहे, येथील फुटपाथ
राज्यकर्त्यांची व सिनेनट्यान्ची, मिळते त्यांना साथ

करोडो रुपये खर्चून, येथे बांधले आहेत पूल
त्याखाली कोणाचे धंदे, तर कोणाची पेटतेय चूल

अनधिकृतपणे राहणार्‍यांची, आहे ही मुंबापुरी
प्रामाणिकपणे जगणार्‍यांच्या, मानेवर टांगती सुरी

जरी येथे घडले, रोजच्या रोज स्फोट
राज्यकर्त्यांच्या वागण्यात, आहे मुळी खोट

बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी, देतील धावती भेट
खोट खोटच रडून, सहानुभूती दाखवतील थेट

मृतांच्या नातेवाईकास दोन लाख, जखमींना पन्नास हजार
नागरिकांच्या जीवीताचा, मांडतील असा बाजार

चौकशी समिती नेमतील, त्यांना ना कशाची भ्रांत
नागरिक मात्र भीतीने, जीवाचा करतील आक्रांत

उपाय मात्र करणार नाहीत, असा काही ठोस
विरोधकांच्याही पायात नाही, कोणाचा पायपोस

एक दिवसाचा मुंबई बंद करून , तेही बसतील शांत
सत्तेवर येण्याची स्वप्ने बघत, झोपतील निवांत

सगळेच पक्ष आहेत, एकाच माळेचे मणी
अतिरेक्यांचा बिमोड करण्यास, नाही पुढे येत कोणी

जनतेनेच आता, खडबडून जागे झाले पाहिजे
डोळे उघडे ठेवून, सदा दक्ष राहीले पाहिजे

मुंबईकरा सावध रहा, रात्र वैर्याची आहे
स्वत:ची काळजी आता, तुलाच घ्यायची आहे







प्रकाशन दिनांक - 8 ऑगस्ट, 2003
अभियंता, बेस्ट इंजिनीयर्स असोसियेशन
स्मरणिका

***********************************************************************************




२. पगारदाराची कैफियत

अरे अरे अर्थमंत्र्या, किती रे तु छळशील
करकर तुझी आमच्यामागे, त्रास किती रे देशील ॥ध्रु॥

पगारदार आम्ही आहोत, प्रामाणिक करदाते
तरीही तु फिरवतोस, आमच्यावरच का जाते?
कर भरून भरून , आमचे पेकाट मोडले
महागाईच्या राक्षसाने, गिळून आम्हाला टाकले ॥ 1 ॥

कर कापून सगळा, घेतो मालक आमचा
तरीही हटट् तुझा, का रे रिटर्न भरण्याचा
कर भरता भरता, आमचे तोंडही सुकले
संसाराची गाडी हाकता, पोट पाठीला लागले ॥ 2 ॥

डॉक्टर वकील दुकानदार, कसे उडवतात गाड्या
राजकारण्यान्च्या घरात, बघ हजारोंनी साड्या
चोर आनंदात कसा, बघ मारतोय मजा
त्याला सोडून संन्याशाला, का रे देतोस सजा ॥ 3 ॥

कायद्याचा बडगा, आम्हाला दाखवशील किती
भ्रष्टाचार्यांना नाही उरली, कायद्याची भिती
गरीब आम्ही गाईसारखे, मारशील रे किती
नरड्यावर आमच्या, कसाया बसशील किती ॥ 4 ॥

तुझ्यावरती आमचा, होता किती रे विश्‍वास
हात धुवून आमच्यामागे, का रे लागलास
करबुडवे आणि करचुकवे, पायलीला पन्नास
त्यांना सोडून आमच्यामागे, का रे लागलास ॥ 5 ॥


पॅन नंबर काढा आणि रिटर्नहि भरा
रोज रोज आमच्यावर, धमकीचा मारा
धक्के बुक्के खाऊन, पॅन नंबर काढला
तुझ्या सांगण्यावरून, रिटर्नहि भरला ॥ 6 ॥

या वर्षी वाटले, आम्हाला दिलासा देशील
वाटले नव्हते आम्हाला, केसाने गळा कापशील
पाठीवरती आमच्या, वार केलास मागून
करबुडव्यांना तू, का रे बसलास बिलगुन ॥ 7 ॥

किती विश्‍वासाने आम्ही, तुला दिले रे निवडून
फसवलेस आम्हाला तू, वाटाण्याच्या अक्षता देऊन
सरकारी संस्था तू, कशा स्वस्तात विकल्यास
स्वेच्छानिवृत्तीचा भूंगा, आमच्यामागे सोडलास ॥ 8 ॥

पगारदार आहोत आम्ही, नाही सोसवत भार
वेळ काढून आमच्यासाठी, दोन घास आम्हा चार
अर्थमंत्र्या अर्थमंत्र्या, किती भरू रे कर
जगू दे सुखाने, शेवटी तुला जोडतो मी कर ॥ 9 ॥






प्रकाशन दिनांक - 8 ऑगस्ट, 2002
अभियंता, बेस्ट इंजिनीयर्स असोसियेशन
स्मरणिका

************************************************************************************